ओळख नवदुर्गेची; कोरोना काळात दिला सर्वसामान्यांना आधार
(लीना माने कोलते)
पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक, कामगारनगरीत सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे काम करत असताना आदर्श शिक्षिका, पुढे एका शाळेचे संचालन करत आदर्श मुख्याध्यापिका म्हणून सुमारे ३५ वर्षे प्रियंका बारसे यांनी शिक्षण क्षेत्रासाठी योगदान दिले. परंतु, तेवढ्यावर न थांबता सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश केला. प्रभागातील नागरिकांच्या समस्या दूर करून आणि कोरोनासारख्या संकटकाळात सर्वसामान्यांसाठी आधारवड बनून आदर्श नगरसेविका म्हणून देखील प्रियंका बारसे यांनी आपला ठसा उमटविला आहे.
शिक्षण, समाजसेवा आणि राजकारण हे तीन प्रमुख आवडीचे विषय असलेल्या प्रियंका बारसे शिक्षिका, मुख्याध्यापिका आहेत. सर्वसामान्य कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील राहिल्या. त्यासाठी त्यांनी काम केले. शेवटच्या माणसापर्यंत पोचण्यासाठी व त्यांना उभे करण्यासाठी त्या नेहमी कार्यतत्पर असतात. कोरोना नावाचा विषाणू जगभर थैमान घालत असताना त्याने भारतातही रौद्ररूप धारण केले. पिंपरी-चिंचवड शहर देखील या विषाणूच्या तडाख्यातून बचावले नाही. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हापासून लॉकडाऊन झाले तेव्हापासून सर्वत्र जनजागृती, वेळेवर मदत आणि सहकार्य करण्याचे काम प्रियांका बारसे आणि टिमने या काळात केले.
सुरुवातीच्या काळामध्ये कोरोना विषाणू काय, तो पसरतो कसा, कशाप्रकारे काळजी घ्यावी, रोग प्रतिकारशक्ती कशाप्रकारे वाढवावी, सोशल डिस्टंसिंग म्हणजे काय, याचा वापर कशासाठी, मास्क, सॅनिटायझर वापर का अशा गोष्टी नागिरकांना समजावून दिल्या. नंतर सॅनीटाझर व मास्क वाटप, नागरिकांची प्रत्यक्ष तपासणी, कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांची स्वतंत्र व्यवस्था, मोफत औषध उपचार, सॅनिटायझर फवारणी असा प्रतिंबधात्मक उपाययोजना करून आजार पसरणार नाही, याकडे त्यांनी लक्ष दिले. वाढत्या आजारामुळे रक्ताची कमतरता जाणवू लागली होती. ही गरज लक्षात घेऊन प्रियंका बारसे यांनी यांच्या प्रभागांमध्ये रक्तदान शिबिर घेतले. यामध्ये 43 नागरीकांनी आपली सेवा म्हणून रक्तदानसाठी पुढे आले. आणि ज्या रुग्णांना आवश्यकता असेल त्या ठिकाणी रक्त पोचवण्याची व्यवस्था देखील यंत्रणेच्या माध्यमातून केली गेली.
लॉकडाऊन फटका सर्वांना बसल्याने रोंददारीवर जगणा-या महिला धान्य वाटप, आरोग्य कर्मचाऱ्यांना, गरजू होतकरू असलेल्या सुमारे आठशे कुटुंबांना धान्याचे वाटप या काळात केले. मजूर वर्गासाठी चहा, बिस्कीट, नाष्टा अशी आठ दिवसांची सोय स्वयंसेवकांच्या माध्यमातून केली. शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण आहार या माध्यमातून गरजू पालकांना तांदूळ देण्यासाठी राज्य सरकार व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मंजूर करून घेत ते घरपोच पाठवण्यासाठी यंत्रणा राबविली. कोरोना योद्धे म्हणून काम करणाऱ्या खाजगी शाळेतील शिक्षकांना पंचवीस लाखांचे विमा कवच मिळवून देण्यासाठी पाठपुरावा त्यांनी केला. तसेच, भोसरी परिसरातील पंचवीस शाळांना नगरसेविका प्रियांका बारसे यांनी 110 सॅनीटाझरचे स्टॅन्ड उपलब्ध करून दिले.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात राहून दिला दिलासा
प्रभागामध्ये कोणी कोरोना पेशंट आढळला, तर त्याच्यावर सर्व औषध उपचार व्हावेत. यासाठी त्यांची दवाखान्यात योग्य ती काळजी घेण्यात यावी. यासाठी सतत फोनवर संपर्कात राहून त्यांची सोय त्यांनी केली. पेशंट बरा होईपर्यंत व नंतर देखील त्याचे मानसिक खच्चीकरण होऊ नये. यासाठी त्यांच्या मनाला उभारी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्य संपर्कात राहून त्यांना दिलासा देण्याचे काम प्रियंका बारसे यांनी केले.
‘डॉक्टर आपल्या दारी’कोरोना काळातील उपक्रम
कोरोना विरुद्ध लढण्यासाठी भोसरीतील गवळीनगरच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये ‘डॉक्टर आपल्या दारी’या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक सोसायट्यांमध्ये डॉक्टरांचे पथक घेऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली गेली. याठिकाणी डॉक्टरांच्या बरोबरीने स्वतः प्रियंका बारसे या जागोजागी जाऊन तपासणीसाठी लोकांना विचारत होत्या. स्वतः मुख्याध्यापक व नगरसेविका असल्यामुळे लोकांना समजावुन सांगण्यास सोपे जात होते.
प्रियंका बारसे यांची झोकून देऊन कामासाठी धडपड
आपल्या कामासाठी झोकून देऊन त्यासाठी धडपड करणे आणि त्या कामामध्ये शंभर टक्के प्रामाणिक राहणे, हेच प्रियंका बारसे यांचे वैशिष्ट आहे. महिलांचे प्रश्न विविध बचत गटांच्या माध्यमातून प्रबोधन करत किंवा कोणत्याही अडी-अडचणी असतील, तर त्या सोडविण्यावर अधिक भर देऊन त्याचे प्रश्न कसे मार्गी लागतील, यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. कामगार महिलांची संघटना देखील सुरू करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या पुढाकार घेतात. एक आदर्श शिक्षिका, आदर्श मुख्याध्यापिका, आदर्श महिला संघटिका, समाजसेविका आणि आता आदर्श नगरसेविका म्हणूून प्रियंका बारसे यांनी आपला ठसा शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उमटविला आहे. म्हणूनच, नुकतीच त्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विविध संस्था, संघटनांकडून सन्मानित
खरंतर सामान्य जनतेसाठी सतत झटणाऱ्या नगसेविका प्रियंका बारसे यांना कोरोना योद्धा म्हणून पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन,शिव बुद्ध युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य,अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह आणि पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नगरसेविका प्रियंका बारसे आपल्या वाटचालीबाबत बोलताना म्हणातात की, “सर्वसामान्य महीला – गृहिणी याच माझी खरी ताकद आहे. अनेक महीला कार्यकर्त्यांनी सर्व कामांमध्ये पुढाकार घेऊन नेहमीच हातभार लावला आहे. समाजामध्ये गरीब व प्रामाणिक माणसाला त्याचा योग्य तो न्याय मिळावा, आणि शिक्षणाच्या माध्यमातून उभे कसे राहता येईल. यासाठी शिक्षण आणि आता राजकारणाच्या माध्यमातून नेहमीच जनतेच्या सेवेसाठी मी उभी राहिली आहे आणि यापुढेही राहीन. यामध्ये माझे कुटुंब खंबीरपणे पाठीशी असल्यामुळे हे सर्व काम करणे मला शक्य आहे”.